पाहूया, द्राक्ष बागेतील खरड छाटणी (April Pruning) संदर्भातील काही महत्वपूर्ण माहिती !

पाहूया, द्राक्ष बागेतील खरड छाटणी (April Pruning) संदर्भातील काही महत्वपूर्ण माहिती !


नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो,

आजच्या ह्या ब्लॉग मध्ये आपण अगदी महत्वाची माहिती घेणार आहोत ती म्हणजे द्राक्ष बागेतील खरड छाटणी. खरड छाटणी म्हणजे काय आणि त्या छाटणी संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. 


द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' (April Pruning) - म्हणजे एप्रिल महिन्यात द्राक्ष वेलींची छाटणी करणे, ज्यामुळे पुढील हंगामात चांगले घड आणि काड्यांची वाढ होते. यासाठी बागेत योग्य पाणी व्यवस्थापन, खत आणि बुरशीनाशक फवारणी आवश्यक असते. 

शेतकरी मित्रांनो जर आपण खरड छाटणी चे व्यवस्थापन अगदी व्यवस्थित आणि टप्याटप्याने केले तर याचाच फायदा पुढे आपल्याला ऑक्टोबर छाटणी च्या वेळेस दिसतो. 

चला तर मग द्राक्ष बागेतील खरड छाटणी चे व्यवस्थापन पाहूया ,

पूर्वीचा द्राक्ष हंगाम ते खरड छाटणी यात कमीतकमी १५-२० दिवसांचे अंतर असणे फार आवश्यक असते. यालाच रेस्टिंग पिरियड (विश्रांती काळ) असे म्हंटले जाते . 

- ह्याच काळामध्ये द्राक्ष बागेतील बेड फोडून घेणे आवश्यक असते. 


  1. बेड फोडल्याने बेड मधील हवा खेळती राहते. 
  2. मागील हंगामातील जे काही क्षार बेडमध्ये जमा झालेय त्याचे निवारण होऊन जाते. 
  3. किडींच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था त्या बेड फोडल्याने उन्हाच्या संपर्कांत आल्याने मरून जातात. 
  4. तसेच बेड फोडल्याने मुळ्या तुटल्या जातात आणि नवीन पांढऱ्या मुळांची वाढ होते 
  5. नवीन मुळांना फुटवा चांगला निघतो. 
  6. त्यामुळे बेड फोडणे हे फार महत्वाचे असते. 


- त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे फळ काढणीनंतर आपल्या प्लॉट ला भरपूर पाणी देणे आवश्यक असते, त्यानंतर दुसरे पाणी, तिसरे पाणी असे टप्याटप्याने पाणी देणे आवश्यक असते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता आपण पाहूया द्राक्ष बागेची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करणे म्हणजे काय?

मागील हंगामातील माल निघून गेल्यानंतर चांगल्या प्रकारची रेस्ट मिळाल्यानंतर द्राक्ष बागेची छाटणी ची तारीख ठरवणे गरजेचे असते. हि तारीख ठरवत असतांना वातावरणाचा अंदाज बघून ठरवावी. 


छाटणी करत असतांना वल्यांड्या वरती एक डोळा ठेऊन १ ते २ इंचावरती छाटणी करावी. संपूर्ण फांद्या काढून टाकाव्या. छाटणी केल्यानंतर प्लॉट मध्ये जो काही कचरा,पालापाचोळा,काड्या हे सर्व बागेतून गोळा करून बाहेर टाकावे. व त्याला वाळवून जाळून टाकावे. 

छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईड पेस्ट ची फवारणी करावी - हि पेस्ट ३०मिली/लिटर पाण्यात घेऊन फवारणी करायची असते. ही पेस्ट छाटणी केलेल्या डोळ्यांवरती लावायची आहे त्यामुळे काडी एकसमान फुटते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चला तर मग शेतकरी मित्रांनो, आता पाहूया द्राक्ष बागेतील खरड छाटणी च्या दरम्यान येणाऱ्या प्रमुख समस्या कोणत्या किंव्हा कोणत्या प्रमुख गोष्टींकडे आपण लक्ष देणे गरजेचे असते

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बागेला योग्य ती विश्रांती देणे - 

उशिराच्या छाटणीमुळे- निर्माण होणाऱ्या समस्या

1) द्राक्ष बागेस पुरेशी विश्रांती न मिळणे 

द्राक्ष काढणीनंतर द्राक्ष बागेस विश्रांती मिळणे आवश्‍यक असते. द्राक्ष काढणीनंतर वार्षिक खतांच्या मात्रांपैकी उरलेली दहा टक्के खतांची मात्रा देऊन पाणी सुरू ठेवावे, त्यामुळे मुळांची वाढ होऊन त्याचा फायदा छाटणीनंतर निघणाऱ्या फुटींवर होतो. 

द्राक्ष बागेत विश्रांती देणे म्हणजे खते व पाणी देऊन वेलीस पुनरुज्जीवित करणे होय; मात्र अनेक द्राक्ष बागायतदार द्राक्ष काढणीनंतर बागेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात व अप्रत्यक्षपणे ताण देतात, हे पूर्णपणे असते.

2) छाटणीपूर्वीच्या मशागतीच्या कामांना वेळ न मिळणे -  खरड छाटणी हा द्राक्षवेलींच्या वार्षिक वाढीचा पाया समजला जातो. छाटणीपूर्वी योग्य मशागत करून साधारणपणे 15-20 टक्के मुळ्यांची नवनिर्मिती होणे आवश्‍यक असते. बागेस आवश्‍यक विश्रांतीचा कालावधी मिळालेला नसल्याने खोल मशागत केल्यास नवीन मुळ्यांच्या वाढीस वेळ लागतो, त्यामुळे उशिरा काढणी झाल्यानंतर मशागतीचे काम करताना जास्त प्रमाणात मुळ्या तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

3) छाटणीपूर्वी खतांची असणारी कमतरता - खरड छाटणीपूर्वी मशागतीबरोबर बेसल डोस म्हणून शेणखत व सुपर फॉस्फेटची मात्रा दिली जाते, तसेच सुरवातीस नत्र व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. मात्र, छाटणीच्या घाईमध्ये ही मात्रा द्यायची राहून जाते. अशा परिस्थितीमध्ये विद्राव्य खतांचा वापर करणे योग्य ठरते. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

छाटणीनंतर फुटी निघण्याच्या समस्येवर उपाययोजना - 

द्राक्षवेलीचा पूर्वीच्या हंगामातील उत्पादनाचा ताण असतानाच खरड छाटणी केली गेल्यास फूट निघण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, तसेच या काळात वाढलेल्या तापमानामुळे वेलीअंतर्गत चयापचय क्रियांचा वेग मंदावतो. तसेच, या कालावधीत पाण्याची कमतरता असल्यास नवीन फुटी जळण्याचा धोका संभवतो. अशा परिस्थितीमध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना करावी. 

1) एकसारख्या फुटी निघण्यासाठी 20 ते 30 मि.लि. हायड्रोजन सायनामाईड प्रति लिटर या प्रमाणात पेस्टिंग करावे. उन्हे कमी झाल्यानंतरच पेस्टिंग करावे, अन्यथा द्राक्ष डोळ्यास इजा होण्याची शक्‍यता असते. 

2) द्राक्ष बागेस पाण्याचा ताण पडू देऊ नये, मुळांच्या कार्यक्षेत्रात पूर्ण वाफसा ठेवावा. 

3) क्षारांच्या सान्निध्यात पांढऱ्या मुळींची वाढ योग्य प्रकारे होऊ शकत नाही, त्यामुळे मुळ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये साचलेले क्षार काढून टाकण्यासाठी गंधक पावडर 50 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीमध्ये मिसळावी. काही दिवसांनी भरपूर पाणी देऊन निचऱ्यास मदत करावी. याचा फुटीसाठी चांगला फायदा होतो. 

4) छाटणीनंतर सातव्या ते आठव्या दिवसापासून रोज दोन ते तीन वेळा पाण्याची फवारणी करावी, त्यामुळे ओलांड्यावर आर्द्रता निर्माण होऊन एकसारख्या फुटी निघण्यास मदत होईल.


निष्कर्ष - 

शेतकरी मित्रांनो, द्राक्ष बागेत दर्जेदार उत्पन्न मिळविण्यासाठी खरड छाटणी चे नियोजन हे अत्यंत गरजेचे आहे. एप्रिल छाटणीमुळे द्राक्ष वेलींची नवीन फुट वाढते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि येणाऱ्या हंगामात अधिक चांगले उत्पन्न मिळते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने छाटणी करणे द्राक्ष बागेच्या उत्पन्नवाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते.


आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !