माती परीक्षणाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
माती परीक्षणाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की माती परीक्षण (Soil Testing) करणे का गरजेचे आहे? माती परीक्षण केल्याने काय फायदे होतात?
माती परीक्षण ही काळाची गरज बनलेली आहे. शेतामध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी मुख्य खतांबरोबरच सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते.
जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या हेतूने, जमिनीची सुपीकता वाढवणे, जमिनीचा पोत सुधारणे, जमिनीत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची उपलब्धता तपासणे (Microorganism's Availability in soil) व भरघोस उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण करणे फार आवश्यक असते.
शेतकरी मित्रांनो आपण नेहमी काय करत असतो की जोमदार पीक वाढीसाठी रासायनिक खतांवर भर देत असतो पण आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही की ज्या जमिनीत हे पीक वाढणार आहे त्याच जमिनीला तिची आवश्यक असलेली अन्नद्रव्य मिळवून देणे हेही फार महत्त्वाचे असते.
शेतातील एक नियम असा सांगतो की, आपण आपल्या पिकाला सगळे पोषक घटक वेळेवर दिले आणि त्यातील एक घटक जरी थोडा कमी झाला तरी देखील एकूण उत्पादनात घट होत असते.
याचाच अर्थ की जमिनीत सर्व पोषक घटकांना एक समान महत्त्व आहे.
माती परीक्षण म्हणजे आपल्या जमिनीत असणाऱ्या रासायनिक व जैविक घटकांचे विश्लेषण करणे होय.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माती परीक्षण चा उद्देश व माती परीक्षण का करावे?
✅ माती परीक्षणामुळे पिकांना देण्यात येणाऱ्या खतांची मात्रा ठरवता येते व त्यामुळे उत्पादन खर्च देखील कमी होतो.
✅ पोषक घटकांच्या उपलब्धतेनुसार मातीचे वर्गीकरण केले जाते.
✅ पिकांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल माती परीक्षणामुळे राखता येतो.
✅ तसेच माती परीक्षणामुळे अतिरिक्त प्रमाणात खते शेतकऱ्यांकडून जमिनीत दिली जात नाही.
✅ जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी व तसेच उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करता येतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माती परीक्षणासाठी नमुना घेण्याची प्रकिया -
माती परीक्षणासाठी प्राथमिक नमुना घेणे फार महत्त्वाचे आहे. जमिनीचा उतार, रंग खोली, पोत याचा सर्वसाधारण विचार करून प्रत्येक विभागातून स्वतंत्र्यरित्या नमूना घ्यावा.
जमिनीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा, दगड गोटे बाजूला करून ३०×३०×३० से.मी. चौकोनी आकाराचा खड्डा घेऊन खड्ड्यातील पूर्ण माती बाजूला काढून त्यानंतर खड्ड्याच्या चारही बाजूची २ से.मी. जाडीची माती माती खुरप्याच्या सहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून घ्यावी.
असे एका एकरातून मातीच्या प्रकारानुसार एकाच प्रकारच्या मातीचे ७ ते ८ ठिकाणावरून नमुना घेण्यासाठी खुरपे, घमेले इत्यादी साहित्याचा वापर करावा.
माती एकत्र करून सावलीत वाळवून एक किलो मातीचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा.
माती परीक्षणासाठी नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी?
- शेतात जनावरे बसण्याची जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, विहिरीवरील जागा, झाडाखालची जागा, उकिरडा इत्यादी जागेतून मातीचे नमुने घेऊ नयेत.
- मातीचा नमुना हा साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर, तसेच शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून नमुना घ्यावा.
- वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केलेले शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
- मातीचा नमुना घेताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्या वापरू नयेत.
निष्कर्ष-
पीक उत्पादनावरील वाढता खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. माती परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीत नत्र, स्फुरद. पालाशयांसह इतर घटक नेमके किती प्रमाणात आहेत याची माहिती मिळण्यास मदत होते. एखाद्या जमिनीत जर नत्र अधिक असेल तर शेतकरी पिकाला नत्राचे प्रमाण कमी देऊन खर्चात बचत करू शकतो. त्याचबरोबर जमिनीतील घटकद्रव्यानुसार पिकाची निवड करण्यास फार मोठी मदत होते.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !



Comments
Post a Comment